पैठण: शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या चैतन्यमय व पावनभूमीत भगवान पांडुरंगाला येण्याचा मोह आवरला नाही.श्रीखंड्याच्या रुपाने भगवंताने नाथाघरी चाकरी केली, अशा शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा 420 वा महोत्सव श्रीक्षेत्र पैठण नगरीमध्ये 26 मार्च ते 28 मार्च या कालावधीत साजरा होत असून या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज फाल्गुन वद्य षष्ठीनिमित्त राज्यभरातून साडेपाचशे दिंड्या पैठण नगरीत दाखल झाल्या आहेत. आज पहाटे चार वाजेपासून या दिंड्या नगर प्रदक्षिणा करण्यासाठी गावातील नाथ मंदिर येथे जमा झाल्या. दिंडीतील वारकर्यांनी विजयी पांडुरंग मूर्तीचे दर्शन घेऊन कृष्ण कमल तीर्थावरील नाथ समाधी मंदिरातील पादुकांचे दर्शन घेऊन तेथे फुगड्या व टाळांच्या गजरात नाचण्याचा आनंद लुटला.
यावेळी पैठणकरांच्या वतीने नाथांची आवडती पुरण पोळीचा प्रसाद वाटप करण्यात आला. फाल्गुन वद्य षष्ठीनिमित्त नाथ वंशजांच्या दिंड़्या गावातील नाथ मंदिरातून निघून समाधी मंदिरात दर्शनासाठी जातात. या ठिकाणी नाथ वंशजाचे कीर्तन होते. नाथ षष्ठीनिमित्त पैठणमध्ये मोठी यात्रा भरली आहे. यात्रेत 25 मार्चपासून संत एकनाथ महाराज सेवेकरी मंडळाच्या वतीने भाविकांना दहा क्विंटल खिचड़ी मोफत वाटण्यात येत असून हा उपक्रम कालाष्टमी (28 मार्च) पर्यंत चालणार आहे. दरम्यान, नाथ षष्ठी यात्रेवर कोणतेही दुष्काळाचे सावट दिसत नसून दुष्काळाची पर्वा न करता लाखो वारकरी व भाविक नाथ नगरीत दाखल झाले आहेत. नाथ समाधीच्या दर्शनासाठी मंदिरापासून ते संभाजी चौकापर्यंत रात्री वारकरी व भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच पवित्र गोदावरी नदीत स्नान करून नाथांचा जयघोष करत भाविक नाथ समाधीस नतमस्तक होताना दिसून आले. पैठण नगरीत मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.